निर्मितीचे स्वप्न सत्यात उतरविता येते..!

निर्मितीचे स्वप्न सत्यात उतरविता येते..!

शांतिवन ने फुलवलेली शेती कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना ठरतेय वरदान.. स्वयंरोगाराची देतेय मोठी संधी

सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना केवळ एकाच चौकटीत राहून साचेबंद काम करीत बसण्यापेक्षा त्याभागातील अनेक प्रश्नांवर संस्थेने काम केले पाहिजे. गेल्या सात वर्षांपासून शांतिवन च्या शेतकरी मनोबल प्रकल्प आणि पाणी अभियान प्रकल्पाच्या माध्यमातून बीड या दुष्काळी जिल्ह्यातील आर्वी आणि इतर गांवात केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे फुललेली हिरवीगार शेती येथील शेकडो शेतकऱ्यांच्या जीवनात वरदान ठरत आहे. या दुष्काळी परिसरात अत्यंत कठीण परिस्थितीत आजूबाजूला तिव्र पाणी टंचाई असताना शांतिवन गटातील शेतकरी मात्र प्रचंड व्यस्त आहेत. जिथे पाणी हा प्रश्न गंभीर असतो तिथे हे शेतकरी उन्हाळी पिके आणि फळबागांचे उत्पादन घेण्यात दंग आहेत.
गेल्या सात वर्षांपासून शांतिवन ने शेतकरी मनोबल प्रकल्प आणि पाणी अभियान हे प्रकल्प राबविल्या मुळे त्याचे आज मोठ्या प्रमाणावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. नदी खोलीकरण, नाला खोलीकरण , बंधारे बांधकाम , तलावातील गाळ काढून तो पडीक जमिनीत टाकणे , शेतकऱ्यांना वैयक्तिक शेत तलाव निर्माण करून देणे, सि सि टी , डीप सी सी टी अशा प्रकारची कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत. या कामामुळे येथील शेतकऱ्यांच्या जीवनात मोठी क्रांती झाली आहे. जिथे केवळ पावसावर आधारित एक पीक घेऊन शेतकरी थांबत होता तिथे आता तो वर्षात तीन पिके घेऊ लागलाय. आज मे महिन्यात भरपुर प्रमाणात शेतकऱ्यांच्या तलावात पाणी उपलब्ध असल्याने अनेकजण आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. कुणी डाळिंबाची बाग लावलीय तर कुणी भाजीपाला , कुणी मिर्ची लावलीय तर कुणी मोसंबी ,संत्रा ची बाग , कुणी टरबूज वाडी करून लाखो रुपयांचे उत्पन्न काढीत आहेत तर कुणी शिंपल्याच्या शेतीचे प्रयोग हाती घेतले आहेत. विशेष म्हणजे हाताला काम नसणारा तरुण वर्ग आता सुधारित शेतकरी झाला असून त्यांनी या कामात आनंदाने स्वतःला गुंतवून घेतले आहे. प्रत्येक जण आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करीत आहे. यामुळे त्यांना स्वाभिमानाने काम करीत स्वयंरोजगार निर्मितीची मोठी संधी निर्माण झाली आहे . संतोष मांडवे , अरुण मांडवे , बाजीराव मांडवे या तरुणांनी टरबूज वाडीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले तर दीपक देवकते यांच्या मोसंबी ने कमी जागेत जास्त उत्पन्न कसे मिळते हे दाखवून दिले. गोरख मोहितेचे कलिंगड तर काका शिंदे ची मिर्ची चांगलं उत्पन्न देऊन गेली. संदिप कदम चे डाळिंब चांगली साथ देत आहेत तर मोसंबी डौलदार आहे. उमेश सानप , गणपत पवळ यांचे डाळिंब बहारात असून विजयचा भाजीपाला चांगली किंमत देऊन गेला . नारायण सुरनळ यांची मोसंबी डौलात आहे. तर गणपत अण्णांचा शिंपल्याच्या शेतीचा प्रयोग यशस्वी होण्याकडे वाटचाल करतोय. प्रातिनिधिक स्वरूपातील ही काही नांवे . पण गटातील प्रत्येक शेतकरी खुश आहे. बारामहिने शेती हिरवीगार पाहून तो उत्साहाने नवे काही शोधण्याची धडपड करतोय. आणि त्या धडपडीतला आनंद लुटतोय. प्रत्येकाला शेती खुप काही देऊ शकते याची खात्री पटली आहे. पाण्याचे महत्त्व समजलं आहे. म्हणूनच ते थेंब थेंब साठवतात आणि थेंब थेंब उपयोगात आणतात. ठरवलं तर कितीही कठीण परिस्थितीत बदल घडू शकतो फक्त त्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे हे दाखवून देणारा शांतिवनचा हा प्रयोग ठरला आहे.
आज या परिसरात सकारात्मक वातावरण तयार झाले असून मोठा बदल घडून येत आहे. दुःखी , कष्टी, वंचीत जीवांच्या आयुष्यात आनंद फुलविता येतो. सकारात्मक विचार मनात ठेवून उरी बाळगलेले निर्मितीचे स्वप्न अथक प्रयत्नाने सत्यात उतरविता येते. आणि त्यातून उजाड माळरानावर नंदनवन फुलू शकते हे दाखवणारा हा प्रयोग ठरला आहे .अर्थात यासाठी अनेकांचे प्रयत्न आणि सहकार्य कामाला आले. शशिकांत चितळे , उदयदादा लाड , सुरेश जोशी , नरेंद्र मेस्त्री, उज्ज्वला बागवडे, वीणा गोखले , अनुश्री भिडे , भावे काका , मिलिंद वैद्य, विजयकुमार ठाकूर, हेमंत डोंगरे , आबा साळुंखे , साई स्मृती मुंबई – जळगांव, आनंदवन मित्रमंडळ, दिवंगत फडके आज्जी, अंजली देशपांडे, उल्हास देशपांडे , श्रध्दा वर्धमाणे , खिंवसरा प्रतिष्ठान, योगेश जोशी , विजय जोशी ,या आणि कित्येक ज्ञात अज्ञात हातानी आजवर मदत केलीय म्हणून ते शक्य झाले. येथील नटलेल्या हिरवळीवर त्यांचा नम्र अधिकार आहे. आम्ही केवळ निमित्त होतो.
दिपक नागरगोजे
शांतिवन , बीड
9923772694